Friday, 8 December 2023

'तसदी'

लेखणीतील अक्षरांचा रंग 

निळा  किंवा भगवा आहे म्हणून ;

त्या रंगाखाली मला घुसडण्याचा प्रयत्न करू नका.. 

मला योग्य वाटेल , आवडेल तो रंग ,

फक्त 'लेखिणीचा रंग उठून दिसावा' 

म्हणूनच वापरलेला असेल.. 

संविधानाने नेमून दिलेल्या पदांचा सन्मान करणं 

हे माझं कर्तव्य मी जाणते पण ;

त्या पदस्थ व्यक्तीचा आदर्शवाद ,

कृपया माझ्यावर लादू नका.. 

तुम्ही 'एखाद्या'च रंगाची होळी 

माझ्या टाळूवर ओतण्याचे कष्ट मात्र घेऊ नका .. !!

चूक - बरोबरच्या स्तंभांमधे तोलून

कुण्या इसमाचं आयुष्य तडीस लावण्यात 

मला मुळीच रस नाही.. 

तुम्ही ते करण्यास भाग पडू नका..!! 

भले तुम्हीच खुशाल मला 

'त्या दोन स्तंभां'मधे तोलला.. 

तुमच्या दृष्टीने बहिष्कृत म्हणून 

जगल्याचा आनंद साजरा करता येईल..!

माझ्या अवतीभोवती गर्दी आहे कैक अत्तरांची.. 

म्हणून एखादं अत्तर मला भेट देऊ नका.. !!

माझ्या रंगीबेरंगी असण्यावर 

निसर्गाला जेव्हा आक्षेप असेल तेव्हा ,

तो समूळ नष्ट करेल माझं अस्तित्व ;

माझ्या अस्तित्वावर कोणता शिक्का मारावा ;

याची तसदी कृपा करून तुम्ही घेऊ नका..!!!


Saturday, 25 April 2020

'प्राक्तन'

प्राक्तनाच्या या क्षणाला ,
तू गीत विजयाचे गावे...
तुझ्या सुराला सूर देत ,
माझे मीच अन् सुखावे...

तुझ्या वेशीला पांघरून ,
तुला असे गाठून काढावे...
माझ्यात बुडल्या त्या कुंचल्याला ,
तुझ्या शाईने केवळ रेखावे...

रेखाटून सूर तुझे ,
गीत गौण साथ म्हणावे...
संपली शाई मोडला कुंचला ,
प्राक्तनाला मग सामोरे जावे...

शामल दीपा 
shamaldeepa00@gmail.com

Thursday, 29 August 2019

' एकदिवशी...'

एकदिवशी ,
कोशातलं पाखरू आणि कार्पोरेट जगातला एक 'रोबोट'
दोघे मेट्रोच्या त्या मोठाल्या पिलर्सकडे बघत जात होते...
अचानक ;
दोघेही मला एकाचवेळी धडकले... आणि
ट्राफिक सिग्नलवर 'हिरव्याचा' - 'पिवळा'
त्यानंतर त्याच 'पिवळ्याचा' 'लाल' कधी होतोय
अशी वाट बघणारी मी... दचकले !

कोशातलं पाखरू ओरडलं ,
" हे पिलर्स पूर्ण व्हायच्या आत ,
आजचा मध गोळा करायचाय वाट सोड माझी !!!"
कार्पोरेट जगातला रोबोट
त्याच्याच धावत्या भाषेत वचकून बोलला ,
" सिटी बस सुटणार माझी आज ;
मेट्रोची वाट बघण्यातच आयुष्य जाणारेय , बाजूला हो...!!!!"

माणसांमधे फक्त 'लाल'च उरला होता
ऐकून होते ,
पण ;
आता भवतीच्या शृंगाराचाही 'लाल' होतोय
हे सांगणारा ठेंगू 'त्या' धडकेत
माझ्या डोक्याला आलाच होता...!!



                                                                                                       shamaldeepa00@gmail.com
                                                                                                                        शामल दीपा 

Tuesday, 28 May 2019

सांग न् माय ह्यो 'कडू घोट' कशापायी ?

पाणी प्यायलो तर कडू लागतंय...
भाकर खाल्ली तर कडूच लागती...
सांग न् माय ह्यो 'कडू घोट' कशापायी ?

पैशे मागितले तर कडू शिव्या मियतात...
खाऊ मागितला तर कडू गोळ्या देत्यात...
सांग न् माय ह्यो 'कडू घोट' कशापायी ?

भाकर मागाय खालच्या गल्लीत काल गेल्तो...
माय खरं खरं सांगतुय बुरशी आल्ती तिला...
कुत्र्याला तेंच्या माय पांढरी भाकर घातली...
एक तुकडा माय मले द्याय बुद्धी कशी अडली ?

माझी कापडं हाइत चिखलात माखलेली...
मळलेले हात माय तेस्नी घाण वाटली...
पाण्याची बाटली तेनी लांबनं व्हती भरली...
पर गेटावरनंच म्या हाक दिली व्हती 'भलं कर आई' ...
सांग  न् माय ह्यो 'कडू घोट' कशापायी ?

माय खरं सांगतुय नकोय मले हे मागून खाणं...
परवडेल मले माय तुझ्या पदरात उपाशी राहणं...
माय म्या शिकून लिवुन मोठा व्हयीन कसली तुले घाई ?
जनोम दिलास आता दे दोन घास भाकर आन दप्तर वई...
मग ,
सांग न् माय ह्यो 'कडू घोट' कशापायी ??
सांग न् माय ह्यो 'कडू घोट' कशापायी ??

                              शामल दीपा शंकर
         shamaldeepashankar@gmail.com

Friday, 24 May 2019

' कुणीतरी असावं... '

कुणीतरी असावं ,
तिचा बिछाना
कायमचा आवरणारं...
तिच्या देहाला माणूस म्हणून
जगायला शिकवणारं...

कुणीतरी असावं ,
तिच्या लक्षवेधी मांड्यांवर
कापड टाकणारं...
तिच्या अतीव वेदनांतूनही
तिला आपलंसं करणारं...

कुणीतरी असावं ,
तिच्या शरीराऐवजी तिच्यातल्या
माणुसपणावर प्रेम करणारं...
तिला स्वतःचं  'असं ' गणित
मांडण्यापासून रोखणारं...

कुणीतरी असावं ,
पैशाच्या खेळात स्वतःचं शरीर
लिलावात विकणाऱ्या तिला थांबवणारं...
'त्यांची' भूक भागवत जीवन कंठणाऱ्या
तिचा खांदा बनणारं...

कुणीतरी असावं ,
तिच्या विवस्त्रपणाला झाकणारं...
तिच्याकडे मायेने बघणारं...
आणि
कुणीतरी असावं ,
तिच्यातली 'माय' शोधणारं...
तिच्यातली 'माय' शोधणारं...

                                               शामल दीपा 
                              shamaldeepa00@gmail.com

Thursday, 28 February 2019

' गोंदण विचारधारेचं '

माझ्या अंगभर गोंदल्या जाताहेत
नाना विचारधारा...
अन् माझ्या वेदनेला मलमपट्ट्याही
लावल्या जाताहेत आज...
जखम भरून निघेतोवर
झालं सांत्वन शब्दांचं पण ;
रक्तबंबाळ मनाच्या समजुतीचं काय ?
मनावरच्या ओरखड्यांसकट
बाहेर पडू पाहतेय विचारधारांच्या कुंपनातून...
तोवर ,
कोण्या एका समूहात जबरदस्ती घुसवलं जातंय मला...
अशा वेळी , मी काय करावं ?
विवेकाचं पाणी आटल्यावर काय प्यावं ?
आदर्शांचं कार्य जपावं की ,
इतिहास बदलणाऱ्यांना शोधावं ?
त्यांच्याच सोयीनं चढवलं जातंय
कोण्या एका विचारधारेला 'काटेरी सुळावर'...
'गोंदलेल्या अंगानं' अन् 'गंजलेल्या' विचारधारांनी'
तह केलाय बहुतेक आता...
माझ्या रक्ताळलेल्या देहातून वेगवेगळे गट शोधून काढण्याचा...
मग आता ,
माझ्या रक्ताचा रंग पाहून ,
शोधणार का माझी भूमिका ?
माझ्या रक्ताचा वास घेऊन ,
सांगणार का माझी विचारधारा ??
एकदा सांगून टाक...
तुझ्या कोणत्या खरेपणाच्या पायावर ;
माझ्यावर ही विचारधारा गोंदलीस ?
तुझा तो खरेपणा इतकाच विवेकी असेल तर
दगड फेकण्यापूर्वी , तलवार फिरवण्यापूर्वी ,
गोळी झाडण्यापूर्वी आणि
माझ्या रक्ताचा थेंब सांडण्यापूर्वी ;
ओळखून दाखव माझी विचारधारा...
ओळखून दाखव माझी विचारधारा...

                              - शामल दीपा
             shamaldeepa00@gmail.com

Sunday, 2 December 2018

' शब्दांची किमया '

लेखणीतील शाई टोकावर ओझरली की , 
समजायचं शब्दांची गर्दी होतेय...
मग काय ; 
शाईचं दौत नजीकच ठेवायचं 
आणि राहून राहून 
लेेखणीला शाईशी भेटवायचं...
पुन्हा लटकवायचं ते दौत चौकटीला आणि
खडसावून सांगायचं लेखणीच्या टोकाला
' स्मरणे तुझी , तुज जवळ ठेव , 
शब्दांची किमया लाख मोलाच्या क्षणाखेरीस होते ,
अन्यथा काहीच हरकत नव्हती 
प्रत्येक बिंदू जोडताना तुला शाईत बुडवण्यास.... '

                             शामल दीपा 
        shamaldeepa00@gmail.com



Thursday, 16 August 2018

' लोप व्हावं सारं काही...! '

डोळे करकचून बंद केल्यावर...
सुकलेली पाने चुरगळल्यावर...
जसा आवाज येतो तसे ,
विचार एकमेकांत गुंतून लोप व्हावं सारं काही...!

कधी - कधी तरीच डोकावणारे विचार...
कधी - कधी तरीच मान उंचावणारे भावनांचे किनार...
लोप व्हावं सारं काही...!

जे डोळ्यांचे काठ ओले करतात...
जे आवंढा गिळून गप्प बसायला लावतात...
लोप व्हावं सारं काही...!

पुन्हा डोळे उघडावे...
आणि डोळ्यांसमोर तेच दिसावं ;
जे नुकत्याच उमललेल्या ,
दव घेऊन मिरवणाऱ्या फुलांसारखं ,
निरागस , नवीन असेल...!

डोळे करकचून बंद केल्यावर...
सुकलेली पाने चुरगळल्यावर...
जसा आवाज येतो तसे ,
विचार एकमेकांत गुंतून लोप व्हावं सारं काही...!!

                         शामल दीपा
       shamaldeepa00@gmail.com

' मोगरा ... '

मागे वळून बघायला लावतोस...
आठवणी आठवून देतोस...
झाकलेले डोळेही उघडतोस...
मंद स्मित ही आणतोस...
नकळत मनाला सुख देतोस...
मिटलेल्या भावना खुलवतोस...
थांबलेले अश्रू ओघळवतोस...
हो तू ,
तूच... मागे वळून बघायला लावतोस...
मोगऱ्याच्या फुला तू कित्ती सुवासिक दरवळतोस...!!
गजरा नको पण तुझी पाकळी हवीशी वाटते...
अख्खं झाड नको मला एका फुलासाठी वाट पाहते...
झाड मिळालं तर सुकलेली फुलं पहावणार नाहीत आणि
एकच फुल घेतलं तर पाकळ्या आयुष्यभर सुगंध टिकवणार नाहीत...
काही गोष्टींचं अर्धवट असणं हेच त्यांचं पूर्णत्व असतं...
म्हणूनच कदाचित मोगऱ्याकडे सारखं मन वळून पाहतं...!

                                 शामल दीपा
               shamaldeepa00@gmail.com

' पुरे झाले आता... '



पुरे झाले आता उत्तरांना शोधणे
प्रश्नांचे सौख्य ते आणखी कशात !

पुरे झाले आता उसासे घेणे
शांत तो श्वास आणखी कशात !

पुरे झाले आता रात्रीचे चिंतने
मनशांती निद्रेची आणखी कशात !

पुरे झाले आता भावनांचे दाखवणे
आपलेच आपणासी वदने आणखी कशात !

पुरे झाले आता स्वतःला समजावणे
नकळत भेदणे आणखी कशात !

पुरे झाले आता शून्यात वाहणे
शून्यातही डोळे भरून पाहणे आणखी कशात !

                                  शामल दीपा
                   shamaldeepa00@gmail.com

Friday, 2 March 2018

स्वप्नातही आजकाल...

स्वप्नातही आजकाल...
दगड उचलले जातात ... तेही रंगांवर...
'निळा' , 'भगवा' , 'हिरवा' अणि आता 'पांढरा' सुद्धा...
क्षितिजावरचा 'निळा' त्यांना दिसत नाही...
मावळतीचा 'भगवा' ते पाहत नाहीत...
माळरानातला 'हिरवा' त्यांना नको वाटतो
आणि आता तर 'पांढऱ्या' रंगावरही आक्षेप...!!!
असे 'दगड खावे लागतील' म्हणूनच कदाचित ;
सगळीकडे सामावलेली 'हवा' आणि 'पाणी'
'रंगहीन' आहेत ... दगड खाण्याचा प्रश्नंच येत नाही......

स्वप्नातही आजकाल...
दगड उचलले जातात... आदर्शांच्या स्मारकांवर...
आज 'हिंसक वृत्तीचे' दगड मारून उभे केले जाते
त्यांच्याच आदर्श कामावर प्रश्नचिन्ह...!!
ना 'ते' रंग जाणत होते ना कुठल्या 'घोषणा' ...
कळीचं फूल व्हावं म्हणून
आवश्यक ते पुरवत राहिले आणि ;
तो जो 'पुरवठा' होता त्यावरच आज
सारे भक्षकासारखे तुटून पडलेत ...
म्हणून ; ना ही कळीचं फूल होतंय ,
ना ही कळीचं अस्तित्व राहतंय...
न उमललेल्या फुलांच्या बागेत हेच ते दगड उचलणारे
पुन्हा गळाभेटी घेत बसतात ... तेही
आपापल्याच रंगांसोबत......

स्वप्नातले 'ते' दगड 'जातीच्या रकान्यावर' कधी उचलले जातील ???
रंगांवरची 'ती' दगडफेक 'धर्मांध विचारांवर' कधी होईल ???
आदर्शांच्या स्मारकावरच्या 'हिंसक माराच्या' खुणा
अंमलात न येणाऱ्या "समान नागरी _ _ _ " वर कधी दिसतील ???
स्वप्नातले 'ते' दगड 'पुरवठा' बनून
अस्तित्व हरवलेल्या कळ्यांचं फूल कधी बनवतील ???
कारण ;
फूलांनी बहरलेल्या बागेत
साऱ्या रंगांसोबत , आदर्शांच्या स्मारकांसमोर
समाजाला रंगपंचमी खेळताना पाहायचंय...
स्वप्नातल्या 'त्या' दगडांना वास्तवात फूल होताना पाहायचंय...
साऱ्या रंगांना एकत्र येताना न्याहाळायचंय...
साऱ्या रंगांना एकत्र येताना न्याहाळायचंय...
                               
                                  शामल दीपा
                shamaldeepa00@gmail.com

(सदरील कवितेस युवक महोत्सव 'युवारंग' - 2018/19 , कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे सुवर्णपदक प्राप्त झालेले आहे.)
                         

Friday, 30 June 2017

' नाही म्हणतात 'आई-बाबा' आमच्याशी बोलताना......!! '

( आई वडील दोघेही शिक्षक असताना आम्हा मुलांच्या मनातील भावना काय असतात याचे वर्णन .... 
माझी स्वलिखित आणि स्वानुभवावर 
आधारित कविता ..... ) 

" सकाळी उठवते आई जिला भलतीच गडबड ,
बाबांना तर वेळच नसतो ऐकायला माझी बडबड ,
शिकवतात शे-दोनशे पोरांना ,
पण घरी मात्र 'नाही' म्हणतात आमच्याशी बोलताना ....

शाळेतलं शाळेत ठेऊन यायचं अशीच त्यांची शिकवण ,
आले की जरा चिड-चिड करतात तोच कंटाळवाणा क्षण ,
आम्हाला काही शाळेत हाताला धरून कोणी नेत नाही ,
पण समाज मात्र 'दोन पगारवाल्यांचं पोर' असाच
आमच्याकडे पाही ...

आम्हाला नाही ऐकू येत घरी गेले की 'सोनू'अशी आईची हाक,
घरी आले नसतं मिळत खायला गरम-गरम काहीतरी झ्याक ,
शाळेतील मुलांशी बोलून येता त्यामुळे तुम्ही खूप थकता ना ,
पण घरी मात्र 'नाही' म्हणता आमच्याशी बोलताना .....

रोज वाटतं आपल्यालाही आई वा बाबांनी शाळेत सोडावं ,
अन शिक्षकांना सरकारने लावलेल्या वेळेच्या
कुंपणाला तोडावं ,
अहो शासन मंडळी जरा आई-वडील आमचे
आमच्यासाठी द्या ना ,
पण घरी मात्र नाही म्हणतात 'आई-बाबा'
आमच्याशी बोलताना .....

कधी-कधी रविवारिही ड्युटीच यांची ,
'परीक्षेचे सुपरविजन' तर कधी घाई 'ज्यादा तासांची' ,
आई-बाबा तुम्ही कोणाचे हे मला सांगाल ना !
पण घरी मात्र नाही म्हणतात आई-बाबा
आमच्याशी बोलताना ....

कड्या-कुलुपं घालायला शिक्षकांची मुलं गुणवंत ,
कारण घरातून पडता बाहेर मुलेच त्यांची औक्षवंत ,
खरं तर सगळी जबाबदारी आणि समज मिळतो
आम्हाला 'गर्भातच' ,
गप्पांसाठी वेळ आम्हाला संध्याकाळी मिळाला तरंच ....

तरी नशीब शासनाने सगळ्याच 'वसतिशाळा' नाही ठेवल्या ,
नाहीतर शिक्षकांची मुलं म्हणजे 'सनाथ' असून असती 'अनाथ बावल्या' ,
ते कसलं 'इलेक्शनचं ट्रेनिंग' आणि 'ड्युटीनं' आम्हाला नकोसं वाटतं ना ,
पण खरंच नाही म्हणतात 'आई-बाबा'
आमच्याशी बोलताना .....

शाळेतून घरी आल्यावर नाही होत आमची लवकर भेट ,
आई-बाबा घरी यायला सहाच वाजतात थेट ,
संध्याकाळी तर आमचा 'अभ्यास' , आणि 'स्टडी' ची वेळ ना ,
पण खरंच नाही म्हणतात 'आई-बाबा'
आमच्याशी बोलताना ....

पालकांचे आले फोन तर लगेच मूड चांगला करून बोलतात ,
माझे आई-बाबा 'पालक मिटिंग' ला मला माझ्या
शाळेत यावेसे वाटतात ,
पण तेंव्हाच नेमकं त्यांचं 'ट्रेनिंग' कसं येतं कळतंच नाही ना ,
पण खरंच नाही म्हणतात 'आई-बाबा'
आमच्याशी बोलताना .....

आजारी पडलो आम्ही तर कुठे रजा टाकून घरी असतात ,
तेव्हा मात्र 'धावपळ स्टॉप' आणि 'अश्रू' त्यांचे गळतात ,
म्हणून वाटतं सारखं-सारखं आजारी पडावं अन भेटावं
'आई बाबांना' ,
पण खरंच नाही म्हणतात 'आई-बाबा'
आमच्याशी बोलताना .....

कट-कट शाळेतली ऐकून ते बिचारे थकतात हो ,
मात्रं यांची शाळेची बोलणी ऐकून फोडावा वाटतो टाहो ,
कोणीतरी आमचा विचार करून पहा ना ,
पण खरंच नाही म्हणतात 'आई-बाबा'
आमच्याशी बोलताना ....!
पण खरंच नाही म्हणतात 'आई-बाबा'
आमच्याशी बोलताना ....!! "

                                            शामल
                  shamaldeepa00@gmail.com

Wednesday, 28 June 2017

' न साहनारा आईचा अबोला '


 " नाही गं सहन होत आई हा अबोला तुझा
सांगूनच चुकले अंतर्मनातील भाव सारा माझा ,
त्या चार गोष्टी आणि ते मोकळे बोलणे कसे गं विसरू 
मनातील तुझ्या रुसवा कसा मी नष्ट करू !!

तुझे कोमल बोलणे आणि सुंदर हसणे 
तुझ्या डोळ्यांतील अश्रू सांगतात तुझे बोलणे ,
जन्म दिलास तू खूप वेदना सहन करून 
माफी मागते गं त्या वेदनांची जाणीव ठेवून...

चुकले माझेच पण अश्रू तू का साहतेस ??
तुझ्या अश्रूंनी वार माझ्या काळजावर करतेस ,
तूच सोबती , तूच मन , 'तूच' माझी आहेस ,
मी तुझी 'सावली' असे तूच एकदा वदलेस...

विश्वास माझा तुझ्यावरचा अजूनही तसाच आहे 
तू मात्र अशी 'अश्रूंनी चिंब' हे मला न साहे ,
परतुनी ये माझ्या माऊली तू माझ्यासाठी 
मी जन्मच घेतलाय 'फक्त तुझ्यासाठी'....

फेडू कसे ऋण मी तुझे कळतंच नाही 
प्रेम तुझे नि माझे नेहमी अथांग राही ,
सोड गं राग अन अश्रू डोळ्यांतले 
तू असावी आनंदी हेच भाव माझ्या मनातले ......
तू असावी आनंदी हेच भाव माझ्या मनातले......"

                                  शामल
           Shamaldeepa00@gmail.com