Friday, 24 May 2019

' कुणीतरी असावं... '

कुणीतरी असावं ,
तिचा बिछाना
कायमचा आवरणारं...
तिच्या देहाला माणूस म्हणून
जगायला शिकवणारं...

कुणीतरी असावं ,
तिच्या लक्षवेधी मांड्यांवर
कापड टाकणारं...
तिच्या अतीव वेदनांतूनही
तिला आपलंसं करणारं...

कुणीतरी असावं ,
तिच्या शरीराऐवजी तिच्यातल्या
माणुसपणावर प्रेम करणारं...
तिला स्वतःचं  'असं ' गणित
मांडण्यापासून रोखणारं...

कुणीतरी असावं ,
पैशाच्या खेळात स्वतःचं शरीर
लिलावात विकणाऱ्या तिला थांबवणारं...
'त्यांची' भूक भागवत जीवन कंठणाऱ्या
तिचा खांदा बनणारं...

कुणीतरी असावं ,
तिच्या विवस्त्रपणाला झाकणारं...
तिच्याकडे मायेने बघणारं...
आणि
कुणीतरी असावं ,
तिच्यातली 'माय' शोधणारं...
तिच्यातली 'माय' शोधणारं...

                                               शामल दीपा 
                              shamaldeepa00@gmail.com

Thursday, 28 February 2019

' गोंदण विचारधारेचं '

माझ्या अंगभर गोंदल्या जाताहेत
नाना विचारधारा...
अन् माझ्या वेदनेला मलमपट्ट्याही
लावल्या जाताहेत आज...
जखम भरून निघेतोवर
झालं सांत्वन शब्दांचं पण ;
रक्तबंबाळ मनाच्या समजुतीचं काय ?
मनावरच्या ओरखड्यांसकट
बाहेर पडू पाहतेय विचारधारांच्या कुंपनातून...
तोवर ,
कोण्या एका समूहात जबरदस्ती घुसवलं जातंय मला...
अशा वेळी , मी काय करावं ?
विवेकाचं पाणी आटल्यावर काय प्यावं ?
आदर्शांचं कार्य जपावं की ,
इतिहास बदलणाऱ्यांना शोधावं ?
त्यांच्याच सोयीनं चढवलं जातंय
कोण्या एका विचारधारेला 'काटेरी सुळावर'...
'गोंदलेल्या अंगानं' अन् 'गंजलेल्या' विचारधारांनी'
तह केलाय बहुतेक आता...
माझ्या रक्ताळलेल्या देहातून वेगवेगळे गट शोधून काढण्याचा...
मग आता ,
माझ्या रक्ताचा रंग पाहून ,
शोधणार का माझी भूमिका ?
माझ्या रक्ताचा वास घेऊन ,
सांगणार का माझी विचारधारा ??
एकदा सांगून टाक...
तुझ्या कोणत्या खरेपणाच्या पायावर ;
माझ्यावर ही विचारधारा गोंदलीस ?
तुझा तो खरेपणा इतकाच विवेकी असेल तर
दगड फेकण्यापूर्वी , तलवार फिरवण्यापूर्वी ,
गोळी झाडण्यापूर्वी आणि
माझ्या रक्ताचा थेंब सांडण्यापूर्वी ;
ओळखून दाखव माझी विचारधारा...
ओळखून दाखव माझी विचारधारा...

                              - शामल दीपा
             shamaldeepa00@gmail.com

Sunday, 2 December 2018

' शब्दांची किमया '

लेखणीतील शाई टोकावर ओझरली की , 
समजायचं शब्दांची गर्दी होतेय...
मग काय ; 
शाईचं दौत नजीकच ठेवायचं 
आणि राहून राहून 
लेेखणीला शाईशी भेटवायचं...
पुन्हा लटकवायचं ते दौत चौकटीला आणि
खडसावून सांगायचं लेखणीच्या टोकाला
' स्मरणे तुझी , तुज जवळ ठेव , 
शब्दांची किमया लाख मोलाच्या क्षणाखेरीस होते ,
अन्यथा काहीच हरकत नव्हती 
प्रत्येक बिंदू जोडताना तुला शाईत बुडवण्यास.... '

                             शामल दीपा 
        shamaldeepa00@gmail.com



Thursday, 16 August 2018

' लोप व्हावं सारं काही...! '

डोळे करकचून बंद केल्यावर...
सुकलेली पाने चुरगळल्यावर...
जसा आवाज येतो तसे ,
विचार एकमेकांत गुंतून लोप व्हावं सारं काही...!

कधी - कधी तरीच डोकावणारे विचार...
कधी - कधी तरीच मान उंचावणारे भावनांचे किनार...
लोप व्हावं सारं काही...!

जे डोळ्यांचे काठ ओले करतात...
जे आवंढा गिळून गप्प बसायला लावतात...
लोप व्हावं सारं काही...!

पुन्हा डोळे उघडावे...
आणि डोळ्यांसमोर तेच दिसावं ;
जे नुकत्याच उमललेल्या ,
दव घेऊन मिरवणाऱ्या फुलांसारखं ,
निरागस , नवीन असेल...!

डोळे करकचून बंद केल्यावर...
सुकलेली पाने चुरगळल्यावर...
जसा आवाज येतो तसे ,
विचार एकमेकांत गुंतून लोप व्हावं सारं काही...!!

                         शामल दीपा
       shamaldeepa00@gmail.com

' मोगरा ... '

मागे वळून बघायला लावतोस...
आठवणी आठवून देतोस...
झाकलेले डोळेही उघडतोस...
मंद स्मित ही आणतोस...
नकळत मनाला सुख देतोस...
मिटलेल्या भावना खुलवतोस...
थांबलेले अश्रू ओघळवतोस...
हो तू ,
तूच... मागे वळून बघायला लावतोस...
मोगऱ्याच्या फुला तू कित्ती सुवासिक दरवळतोस...!!
गजरा नको पण तुझी पाकळी हवीशी वाटते...
अख्खं झाड नको मला एका फुलासाठी वाट पाहते...
झाड मिळालं तर सुकलेली फुलं पहावणार नाहीत आणि
एकच फुल घेतलं तर पाकळ्या आयुष्यभर सुगंध टिकवणार नाहीत...
काही गोष्टींचं अर्धवट असणं हेच त्यांचं पूर्णत्व असतं...
म्हणूनच कदाचित मोगऱ्याकडे सारखं मन वळून पाहतं...!

                                 शामल दीपा
               shamaldeepa00@gmail.com

' पुरे झाले आता... '



पुरे झाले आता उत्तरांना शोधणे
प्रश्नांचे सौख्य ते आणखी कशात !

पुरे झाले आता उसासे घेणे
शांत तो श्वास आणखी कशात !

पुरे झाले आता रात्रीचे चिंतने
मनशांती निद्रेची आणखी कशात !

पुरे झाले आता भावनांचे दाखवणे
आपलेच आपणासी वदने आणखी कशात !

पुरे झाले आता स्वतःला समजावणे
नकळत भेदणे आणखी कशात !

पुरे झाले आता शून्यात वाहणे
शून्यातही डोळे भरून पाहणे आणखी कशात !

                                  शामल दीपा
                   shamaldeepa00@gmail.com

Friday, 2 March 2018

स्वप्नातही आजकाल...

स्वप्नातही आजकाल...
दगड उचलले जातात ... तेही रंगांवर...
'निळा' , 'भगवा' , 'हिरवा' अणि आता 'पांढरा' सुद्धा...
क्षितिजावरचा 'निळा' त्यांना दिसत नाही...
मावळतीचा 'भगवा' ते पाहत नाहीत...
माळरानातला 'हिरवा' त्यांना नको वाटतो
आणि आता तर 'पांढऱ्या' रंगावरही आक्षेप...!!!
असे 'दगड खावे लागतील' म्हणूनच कदाचित ;
सगळीकडे सामावलेली 'हवा' आणि 'पाणी'
'रंगहीन' आहेत ... दगड खाण्याचा प्रश्नंच येत नाही......

स्वप्नातही आजकाल...
दगड उचलले जातात... आदर्शांच्या स्मारकांवर...
आज 'हिंसक वृत्तीचे' दगड मारून उभे केले जाते
त्यांच्याच आदर्श कामावर प्रश्नचिन्ह...!!
ना 'ते' रंग जाणत होते ना कुठल्या 'घोषणा' ...
कळीचं फूल व्हावं म्हणून
आवश्यक ते पुरवत राहिले आणि ;
तो जो 'पुरवठा' होता त्यावरच आज
सारे भक्षकासारखे तुटून पडलेत ...
म्हणून ; ना ही कळीचं फूल होतंय ,
ना ही कळीचं अस्तित्व राहतंय...
न उमललेल्या फुलांच्या बागेत हेच ते दगड उचलणारे
पुन्हा गळाभेटी घेत बसतात ... तेही
आपापल्याच रंगांसोबत......

स्वप्नातले 'ते' दगड 'जातीच्या रकान्यावर' कधी उचलले जातील ???
रंगांवरची 'ती' दगडफेक 'धर्मांध विचारांवर' कधी होईल ???
आदर्शांच्या स्मारकावरच्या 'हिंसक माराच्या' खुणा
अंमलात न येणाऱ्या "समान नागरी _ _ _ " वर कधी दिसतील ???
स्वप्नातले 'ते' दगड 'पुरवठा' बनून
अस्तित्व हरवलेल्या कळ्यांचं फूल कधी बनवतील ???
कारण ;
फूलांनी बहरलेल्या बागेत
साऱ्या रंगांसोबत , आदर्शांच्या स्मारकांसमोर
समाजाला रंगपंचमी खेळताना पाहायचंय...
स्वप्नातल्या 'त्या' दगडांना वास्तवात फूल होताना पाहायचंय...
साऱ्या रंगांना एकत्र येताना न्याहाळायचंय...
साऱ्या रंगांना एकत्र येताना न्याहाळायचंय...
                               
                                  शामल दीपा
                shamaldeepa00@gmail.com

(सदरील कवितेस युवक महोत्सव 'युवारंग' - 2018/19 , कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे सुवर्णपदक प्राप्त झालेले आहे.)